Sunday, September 20, 2009

थेंब..


अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एक दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थार्थारणाऱ्या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

जाता जाता

''जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतामधुनी राहीन मी''

Saturday, August 1, 2009

म्हणून..

विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची..

अशा क्षणाला..

अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे,
तीमिरही माझा दिवाही माझा माझे जाळणे.

परंतु केव्हा अशा क्षणाला
लाख गवाक्षे भवती खुलती
उचलुनी घेती रस्त्यावरूनी
प्रकाश काही काही माती

आणि पुन्हा विवरात चालते जुनेच जाळणे
परंतु त्या ज्वलनात उमलते नवीन कळणे.....

Wednesday, July 15, 2009

''कणा''

''ओळखलत का सर मला-''पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले,केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
'गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रकाश म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेवून संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला-
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा;'

Tuesday, July 14, 2009

कोलंबसाचे गर्वगीत.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा,डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले
दडू द्या पाताळी सविता
आणित्यांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळू दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला ,सूड-समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदचुता तव भीषण नर्तन असेच चालू दे
फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी
नाविका न कुठली भीती

सहकार्यानो,का ही खंती जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापारी असीम नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हाला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहून घेवू जळी समाधी सुखे,कशासाठी
जपावे पराभूत प्राणा

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती,
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नाव क्षितिजे पुढती

मार्ग अमुचा रोखू शकती ना धन ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळया सागराला
''अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला''