Sunday, October 11, 2009

क्रांतिचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार
अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार

खळखळु द्या या अदय श्रुंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात ?
सर्पांनो, उद्दाम आवळा कसूनिया पाश
पिचेल मनगट परी उरांतिल अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार ?
कधीही तारांचा संभार ?

क्रुद्ध भूक पोटात घालु द्या खुशाल थैमान
कुरतडु द्या आतडी करु द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीच आव्हान
बलशाली मरणाहुन आहे अमुचा अभिमान
मृत्युंजय आम्ही, आम्हाला कसले कारागार ?
अहो, हे कसले कारागार ?

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
हो‍उनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधि न थांबले विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधु न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार

श्वासांनो, जा वायुसंगे ओलांडुन भिंत
अन्‌ आईला कळवा अमुच्या हृदयांतिल खंत
सांगा "वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परी अनिवार
त्यांना वेड परी अनिवार

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यांत ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनि गुन्हेगार
देता जीवन‍अर्घ्य तुजला ठरलो वेडे पीर
देशिल ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई, वेड्यांना आधार !"

कशास आई, भिजविसि डोळे उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते
उठतिल त्या ज्वालांतुन भावी क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार

आता कर ओंकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यांवरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येउ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरिरांचा कर सुखेनैव या,सुखेनैव संहार
मरणा,सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार

उठा उठा चिऊताई!

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही !

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिआ दूर जाई
भूर भूर भूर भूर !

Sunday, September 20, 2009

थेंब..


अनंततेचे गहन सरोवर
त्यात कडेला विश्वकमल हे
फुले सनातन
त्या कमळाच्या
एक दलावर
पडले आहे
थोडे दहिवर
थार्थारणाऱ्या त्या थेंबाला
पृथ्वीवरचे आम्ही मानव
म्हणतो जीवन

जाता जाता

''जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतामधुनी राहीन मी''

Saturday, August 1, 2009

म्हणून..

विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती
म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची
जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली
म्हणून नाही खंतही तिजला मरावयाची..

अशा क्षणाला..

अखेर माझे जीवन म्हणजे माझे कळणे,
तीमिरही माझा दिवाही माझा माझे जाळणे.

परंतु केव्हा अशा क्षणाला
लाख गवाक्षे भवती खुलती
उचलुनी घेती रस्त्यावरूनी
प्रकाश काही काही माती

आणि पुन्हा विवरात चालते जुनेच जाळणे
परंतु त्या ज्वलनात उमलते नवीन कळणे.....

Wednesday, July 15, 2009

''कणा''

''ओळखलत का सर मला-''पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले,केसांवरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून
'गंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रकाश म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेवून संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला,
'पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला-
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा;'

Tuesday, July 14, 2009

कोलंबसाचे गर्वगीत.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा,डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे
ढळू दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले
दडू द्या पाताळी सविता
आणित्यांची ही अधिराणी दुभंग धरणीला
कराया पाजळू दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला ,सूड-समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदचुता तव भीषण नर्तन असेच चालू दे
फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी
नाविका न कुठली भीती

सहकार्यानो,का ही खंती जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापारी असीम नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हाला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा अपुला बाणा
त्याहून घेवू जळी समाधी सुखे,कशासाठी
जपावे पराभूत प्राणा

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती,
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नाव क्षितिजे पुढती

मार्ग अमुचा रोखू शकती ना धन ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळया सागराला
''अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला''

Monday, July 13, 2009

दूर मनोऱ्यात...

वादळला हा जीवनसागर -अवसेची रात
पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात

भाम्बावूनी अभ्रांच्या गर्दीत गुद्मरल्या तारा
तडतडा फाडतो उभे शीड वारा

पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचंड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गलबते आपुली अशा कालराती
वाव्तालीतील पिसाप्रमाणे हेलावत जाती.
परंतु अंधारात चकाके बघा बंदरात
स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोडीत बसला तेजाची लेणी
उज्जवल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात
अन लावा र्हुदयात सख्यानो,आशेची वात.